Kokan Darvaja Rajmachi

योगेश राजमाचीची कोकण दरवाज्याची वाट करून आला तेव्हा नमिताला मी तो शिडीचा फोटो दाखवला. पावसापूर्वी हि वाट कधी करता येईल ? ९ जूनला जमेल! तेव्हा करूया ठरलं. यंदा पाऊस उशिरा सुरु होणार आहे.

८ जूनची संध्याकाळ.  कल्याण स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ४. सह्याद्री एक्सप्रेस येते. मी, नमिता, किशोरी आणि अमेय गाडी पकडतो. भावना, मधुरा आणि शलाका दादरला बसून आल्यात. गप्पा टप्पा, शलाकाने आणलेले लाडू खात कर्जत आलं. काळोख पडलाय. खिडकीतून अजूनही गरम हवा येते. खंडाळ्यापासून जरा गार वारा लागला. लोणावळा उतरून स्टेशन बाहेर यायला आम्हाला ९ वाजले.  राजमाचीच्या अतुलशी माझं जीपसाठी सकाळी बोलणं झालं होतं. इथे आलो तर गाडीचा पत्ता नाही. अतुलला फोन केला,  त्याने दुसऱ्या गाडीवाल्याचा नंबर दिला. रात्री १० वाजेपर्यंत, १ तास लोणावळ्याला मच्छर मारले. आमची रेल्वे गाडी पाऊण तास लेट आली तोवर जीपवाला मिळेल ते पॅसेंजर घेऊन राजमाचीला गेला. माझा फोन बहुदा बोगद्यात असल्याने  काही लागला नाही. परत यायला त्याला १० वाजले. निघालो बुवा एकदाचे. जरा तगमग झाली खरी. स्टेशनला एवढ्या वेळात राजमाचीला जाणारे लोंढे उतरत होते.

डेला मागे पडलं आणि ठिकठिकाणी साचलेल्या गाड्या, त्यातना उतरलेली काजवे शोधणारी माणसं दिसू लागली. फणसराई आली आणि काजव्यांचा मागावर असणाऱ्या पायदळाच्या तुकड्या दिसू लागल्या. राजमाचीला पोहोचेस्तोवर या फौजा दिसत होत्या. आज साधारण ५००० माणसं राजमाची मुक्कामी आहेत. आमची वेळ चुकलीच.
साडे अकरा वाजलेत. अतुल कडे जेवलो आणि पहिल्या मजल्यावर गच्चीत पथारी पसरून टेकलो. उकाडा आहेच. सकाळी बरी झोप येते तो उठायची वेळ झाली. सकाळी सातला नाश्ता करून साडेसातला आम्ही मुक्काम हलवला.

येताना नकाशा तयार करून आणला होता. त्याच्या आधारे शोधत कोकण दरवाज्यापाशी आलो. सकाळी ७:४९ शिडीचा रेकॉर्ड शॉट आहे माझ्याकडे. शिडी जवळच्या पठारावर काही तंबू लागले होते. सुरेख जागा आहे. पुन्हा यायला पाहिजे इथे राहायला. हे शिडीचे अक्षांश आणि रेखांश 18.824367, 73.389120. अतुल सावंतांच्या घराच्या साधारण पश्चिमेला ६१५ मीटर एरियल डिस्टन्स वर हि जागा आहे. दरवाजा वगैरे काही नाही. पूर्वी असल्यास कल्पना नाही. एक लाकडाची पूल वजा शिडी आहे. शिडीच्या वरच्या अंगाला थोडं दक्षिणेला तटाजवळ एक मोठा ओढा आहे. पावसात इथे धबधबा असावा. या ओढ्यात एक तटबंदी सारखी भिंत आहे. आणि त्या भिंतीला एक दिंडी. एकेक करून सावकाश शिडी उतरलो तोवर साडे आठ वाजले. शिडीच्या वरच्या अंगाला थोडा घसारा आहे. शिडी उतरवून खाली पठारावर सपाटीला बसलो समोर खंडाळ्याच्या घाटातला रेल्वेचा ट्रॅक दिसतोय. चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या गाड्या दिसताहेत. गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. चाकांचा आणि ब्रेकचा आवाज. दूर नागफणी पर्यंत दिसतंय. खाली मुंडेवाडी, कोंडाणा गाव दिसतंय. ८:५५ झालेत. 

नवीन अपिरिचित जागी  जायला मला आवडत. त्यातून वाट शोधून काढायची असेल तर अजून मजा येते. हि वाट शोधताना आम्हाला करवंद मिळाली. वाटेच्या दक्षिणेला तटाजवळ उभे राहिल्यावर आम्हाला सुरवातीला दरीत खाली हि सोंड दिसली आणि तिच्यावरून उतरणारी वाट. अशीच आणि एक वाट कातळधार धबधब्याकडे सुद्धा उतरते असं ऐकून आहे. 

शिडीकडून पुढे वाट सोंडेवरून खाली उतरते. अतिशय सुंदर सोंड आहे. msl २५० मीटर उंचीवर कोंडाणा लेणी आहेत. तेवढी उंची उतरेस्तोवर वाट सोंडेवरून येते. शेवटच्या टप्प्याला बांबूची खुरटी झाडं आहेत. तिथल्या एका झाडावर गरुड बसला होता. सोंड उतरून पदरात वाट आली कि डावीकडे ना जाता आम्ही उजवीकडे वळलो. आता लेणी येईस्तोवर सपाट चाल. इथेच मला सर्वात जास्त त्रास झाला. उकडतंय. (नंतर कळालं गेल्या ३ वर्षातील जून महिन्यातील सर्वात उष्ण दिवस हा होता) साधारण ११ वाजता लेण्या पासून जरा दूर थांबून आम्ही खाली मुंडेवाडीकडे चाललोय. राजमाचीचा नेहमीचा रस्ता आणि त्यावरून उतरणारी मंडळी आम्हाला भेटताहेत. मुंडेवाडी आणि सपाट चालीने कोंडाणा. अजय वरेचं घर. साडेबारा वाजलेत. उन्हात ट्रेक करायचा म्हणजे कडी परीक्षा. उन्हाने आम्ही जरा  भिरभिरलोय. किशोरी अजयचं घर सोडून जरा पुढे गेली. आली ती जरा वैतागलेली. तोवर मी तिथल्या नळाखाली अंघोळ करून नवीन कपडे घालून घेतले. 

पोटभर रुचकर शाकाहारी जेवण, थोडी वामकुक्षी, रिक्षाने कर्जत. ४:१४ च्या लोकलने घरी. बदलापूर पासून तुडुंब भरली ती गाडी. सेंट्रल रेल्वे जिंदाबाद. 

पावसात या सोंडेवरून चढून यायला मला आवडेल. शिडीची परिस्थिती काय असते पावसात कुणास ठाऊक ? राजमाची ची नवीन वाट करण्याची इच्छा असणाऱ्यांनी इथे वाट वाकडी करायला हरकत नाही. 

– मधुकर धुरी 

जीपीएस ट्रॅक 
https://drive.google.com/open?id=1mWRw1Kkjo4zAv-BY4FmWbVj_t_FHPkGU&usp=sharing

हि वाट अनुभवी ट्रेकर्ससाठी आहे. नवख्या ट्रेकर्सनी घाटवाटांचा अनुभव असणारा सोबत नसल्यास टाळावी. 

ट्रेकिंग हा साहसी खेळ आहे. इथे व्यसनांना अजिबात स्थान नाही. व्यसन आणि ट्रेक याची सांगड म्हणजे अपघातास नक्की निमंत्रण. तेव्हा व्यसने टाळा. ट्रेक करताना निसर्ग, स्थानिक यांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. “Leave nothing but footprints. Take nothing but photos. Kill nothing but time. Keep nothing but memories”.

Create your website with WordPress.com
Get started